न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ जानेवारी २०१९) :- पिंपरी चिंचवड महापालिकेने सुमारे २०० कोटी रुपये खर्चून भोसरी येथे सुपरस्पेशालिटी रुग्णालयाची उभारणी केली ती गोरगरीब जनतेला उपयोगी पडावे म्हणून. या अनुषंगानेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या वास्तूचे भुमिपूजन त्यावेळी केले होते.
भाजपाची सत्ता आल्यानंतर त्यांनी या रुग्णालयाचे खासगीकरण करून, ३० वर्षाच्या कालावधीसाठी ठेकेदाराला चालविण्यास देण्याचा घाट घातला. मात्र, ही जनतेची दिशाभूल असून हा ठराव रद्द करून जनतेला समर्पित करावा, अशी मागणी आधार सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष विकास भुंबे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, खासगीकरण हे जनहित विरोधी देशद्रोही धोरण आहे. खासगी रुग्णालयांमध्ये बहुतांश ठिकाणी सामान्य गरीब नागरिकांना मोफत वा माफक दरात उपचार मिळत नाहीत. त्यामुळे राज्य सरकारने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त हर्डीकर यांना भोसरी रुग्णालय खासगीकरणाचा ठराव रद्द वा विखंडित करण्याकरीताचे आदेश द्यावेत. अन्यथा मुख्यमंत्री या नात्याने BPMC कायद्यातील विशेषाधिकार वापरुन, स्वत:च हा ठराव रद्द करून महापालिकेस स्वत:रुग्णालय चालविण्याचे आदेश द्यावेत.
महापालिका आयुक्त सहकार्य करत नसल्यास त्यांची बदली करुन दुसरे चांगले आयुक्त नेमावेत. पालिकेने नागरिकांच्या पैश्यातून आधीच कोट्यवधी रुपये या हॉस्पिटलच्या उभारणीवर खर्च केलेले आहेत. महापालिकेचे वायसीएम रुग्णालय हे चांगल्या सुविधा माफक दरात पुरवीत आहेत. त्यामुळे वायसीएमच्या धर्तीवर भोसरी रुग्णालयाची अंमलबजावणी व्हावी, असे या पत्रात भुंबे यांनी म्हटले आहे.
भोसरी रुग्णालय खासगीकरणाचा विषय हा त्वरित सार्वजनिक आरोग्य व नगरविकास विभागाकडे पुढील कार्यवाहीसाठी वर्ग केला आहे.
– मुख्यमंत्री कार्यालय…