न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ फेब्रुवारी २०२०) :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या बारावीच्या परीक्षेला मंगळवार ( दि. १८ ) पासून प्रारंभ होणार असून शहरातील २४ हजार ७०३ विद्यार्थी यावर्षी परीक्षा देणार आहेत. शहरातील विविध शाळेतील २७ केंद्रावर ही परीक्षा होणार असून परीक्षा सुरळीत पार पडावी, यासाठी शिक्षण विभागातील अधिकारी आणि पोलीस प्रशासनाचीही मदत घेतली जाणार आहे.
आज मंगळवारी सकाळी बारावीच्या विद्याथ्यांचा इंग्रजी विषयाचा पहिला पेपर सकाळी ११ ते २ या वेळेत होणार आहे. यावर्षी २४ हजार ७०३ विद्यार्थ्यांसाठी २७ केंद्रे करण्यात आली आहेत. कॉपीमुक्त वातावरणात बारावीच्या परीक्षा व्हाव्यात, यासाठी विशेष तयारी करण्यात आली तरी मागील वर्षीप्रमाणे यावर्षीही पिंपरी – चिंचवड शहरातील २७ केंद्रावर दोन भरारी पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. शिक्षण मंडळाने पिंपरी विभागासाठी प्राथमिक आणि माध्यमिक अशी दोन भरारी पथकाची नियुक्ती केली आहे.
बारावीच्या परीक्षेसाठी जाताना परीक्षार्थी विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर वेळेवर पोहचता यावे, यासाठी ‘ पीएमपी ‘ च्या वतीने परीक्षा कालावधीमध्ये जादा बसची सोय करण्यात आली आहे. त्यामुळे, विद्यार्थ्यांना परीक्षेला जाताना आणि येताना बसची वाट पाहत ताटकळत उभे रहावे लागणार नाही. जादा बसची सोय करण्यासंदर्भात १४ आगारांना सूचना देण्यात आल्या असून त्यानुसार पिंपरी – चिंचवड व पुणे शहरात जादा बस सोडण्यात येणार आहेत.