- आयआयबीएम कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट आणि हिंदुस्तान यूनिलिव्हरचा उपक्रम
- “वुमन शेफ कोम्पीटिशन २०२०” पाककला स्पर्धेस महिलांचा उस्फुर्त प्रतिसाद…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ फेब्रुवारी २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरातील महिलांसाठी चिखलीतील ”आयआयबीएम कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट आणि हिंदुस्तान यूनिलिव्हर” यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आपला आवाज आपली सखी मीडिया पार्टनर’ आयोजित “वुमन शेफ कोम्पीटिशन २०२०” ही ‘पाककला कौशल्य व आतिथ्यशील वृत्ती उत्कृष्ट संगम’ स्पर्धा मोठ्या उत्साहात आज शनिवारी (दि. २२) रोजी पार पडली.
यावेळी हिंदुस्तान यूनिलिव्हरचे मुख्य शेफ आशिष ढमाले, आयआयबीएम कॉलेजचे संस्थापक डॉ. धनंजय वर्णेकर, शितल वर्णेकर, संचालक राम रैना, विभागप्रमुख डॉ. गायकवाड़, विभागप्रमुख अमोल भागवत, आयआयबीएम कॉलेजचे मुख्य शेफ सचिन देसाई, तसेच प्राध्यापक आदित्य वर्तक, गिरीश काटे, पिटर गोम आदी उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड शहरातून या पाककला स्पर्धेत १०० हून अधिक महिलांनी सहभाग नोंदवला. सहभागी सर्व महिला स्पर्धकांनी गोड आणि तिखट यासह विविध खाद्यपदार्थ तयार केले. तसेच, त्याचे प्रदर्शनही भरविण्यात आले. या खाद्यपदार्थांचे हिंदुस्तान यूनिलिव्हरचे प्रमुख शेफ आशिष ढमाले व आयआयबीएम कॉलेजचे संस्थापक डॉ. धनंजय वर्णेकर, संचालक राम रैना या परीक्षकांनी स्पर्धेचे परीक्षण केले. या पदार्थांमधून सर्वोत्कृष्ट पाककृती करणाऱ्या स्पर्धेतील आठ उत्कृष्ट पाककलांची बक्षिसांसाठी निवड करण्यात आली. तसेच या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व तुळशीचे रोप देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी स्पर्धेतील सर्व सहभागी महिला स्पर्धकांनाही सहभागी प्रमाणपत्र देण्यात आले.
आयआयबीएम कॉलेजचे संस्थापक डॉ. धनंजय वर्णेकर व संचालक राम रैना म्हणाले की, ‘स्त्रीच्या अंतर्मनाचा आविष्कार ओळखून त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, महिलांची लज्जतदार रेसिपीची सर्वाना ओळख व्हावी, या माध्यमातून महिलांना विरंगुळा मिळावा यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. पाककला स्पर्धेच्या निमित्ताने महिलांमध्ये आत्मविश्वास वाढीस लागला. यापुढेही संस्थेच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबविण्याचा संकल्प आम्ही करणार आहोत’.
ही पाककला स्पर्धा आयआयबीएम कॉलेजचे संचालक राम रैना यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. स्पर्धेचे नियोजन हॉटेल मॅनेजमेंटच्या तृतीय वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी केले तर, आभार प्रदर्शन डॉ. गायकवाड यांनी मानले.