न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ फेब्रुवारी २०२०) :- रहाटणी येथील क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन फाऊंडेशन संचालित न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडीयम स्कूल यांच्या वतीने मराठी राजभाषा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार यांच्या हस्ते कविवर्य. वि. वा. शिरवाडकर यांच्या प्रतिमेचे व सरस्वतीचे पूजन करण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते भगवान गोडांबे, मोमीन सर, सिलव्हेनिया जाधव, रेणू राठी उपस्थित होते.
“लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्म, पंथ, जात, एक मानतो मराठी, एवढया जगात माय मानतो मराठी…” मराठी भाषा आमुची मायबोली – म्हणजे मातृभाषा. मराठी भाषेचा हाच गोडवा कित्येक साहित्यिक, गीतकार व गायकांनी आपल्यापरिने समृद्ध करण्यास अनमोल योगदान दिलेले आहे, असे प्रतिपादन संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार यांनी केले.
यावेळी शिक्षकांनी, विद्यार्थ्यांनी मराठी कविता, मराठी गीत सादर केले. तसेच हिंदी विषयाचे शिक्षक अनुराग यादव यांनी मराठी गीत गाऊन मराठी भाषेला प्राधान्य दिले. मराठी गौरवानिमित्ताने काव्य वाचन, भित्ती चित्र स्पर्धा घेण्यात आली. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. मेघा भाट आणि सचिन कळसाईत ह्यांनी सूत्रसंचालन केले.