- शिक्षणभूषण आण्णासाहेब जाधव यांच्या ८६ व्या वाढदिवशी सस्नेह शुभेच्छांचा वर्षाव…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ५ मार्च २०२०) :- शिक्षण क्षेत्रात सामान्य कामगार वर्गाच्या पाल्यांना दर्जेदार शिक्षणाची संधी निर्माण करून देणाऱ्या चिंचवडच्या विकास शिक्षण मंडळ या संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष आदरणीय रामचंद्र ऊर्फ आण्णासाहेब जाधव यांचा ८६ वा वाढदिवस ५ मार्च २०२० रोजी मोठ्या जल्लोषात विद्यालयाच्या प्रांगणात साजरा करण्यात आला.
विद्यालयातील सर्व शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी आण्णांचे ढोल-ताशा आणि टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत केले. आधुनिक कृतीयुक्त शिक्षणाचा वसा घेतलेल्या आणि मॉडेल्स द्वारे अध्यापन प्रक्रिया राबवून शिक्षण क्षेत्रात आमुलाग्र क्रांती घडविणाऱ्या आण्णांना सर्व उपस्थितांनी वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी सत्कारमूर्ती आण्णासाहेबांनी आपल्या शुभहस्ते विद्यालयातील विद्यार्थ्यांना गोड खाऊ देऊन शुभाशीर्वाद दिले. या कार्यक्रमास संस्थेचे उपाध्यक्ष जगदीश जाधव, संचालक अमित बच्छाव, विजय जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमप्रसंगी बाल, प्राथमिक, माध्यमिक व उच्चमाध्यमिक विभागातील सर्व शिक्षक आणि कर्मचारी वर्ग उपस्थित होता. या प्रसंगी आण्णांच्या सबंध जीवनशैलीचा थोडक्यात आढावा घेण्यात आला.
आपल्या प्रास्ताविकपर मनोगतात विद्यालयाचे पर्यवेक्षक दत्तात्रय भालेराव यांनी अण्णांच्या शैक्षणिक प्रवासाची खडतर सुरुवात उपस्थितांसमोर मांडली. प्रतिकूल परिस्थितीतही इच्छाशक्ती प्रबळ असल्याने शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश प्राप्त झाले आणि महाराष्ट्रातील अनेक मंत्र्यांच्या हस्ते, अनेक उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या हस्ते पुरस्कार देऊन शिक्षणमहर्षी, शिक्षणभूषण, विद्याभूषण अशा अनेक उपाधींनी आण्णांना सन्मानित करण्यात आल्याचेही ते म्हणाले. स्वत:च्या कौटुंबिक सुखांचा त्याग करून नि:स्वार्थ हेतूने सर्वसामान्यांच्या मुलांना दर्जेदार शिक्षण देऊन चांगल्या उपजीविकेची संधी उपलब्ध करणाऱ्या आण्णांच्या शिस्त, संस्कार आणि अनुभवांचा सर्व शिक्षकांना प्रभावी अध्यापानाकरीता सदोदित उपयोग होत असल्याचेही ते म्हणाले.
अण्णांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीकरिता अनेक शैक्षणिक आणि भौतिक सुविधा निर्माण करून दिलेल्या आहेत. सुसज्ज ग्रंथालय, संगणक कक्ष, विज्ञान विषय प्रयोगशाळेबरोबरच उपयुक्त अशा असंख्य मॉडेल्सयुक्त गणित प्रयोगशाळा, आधुनिक भूगोल प्रयोगशाळा, बोली भाषेतील इंग्रजीच्या प्रगतीकरिता इंग्रजी विषयाची प्रयोगशाळा, विद्यार्थ्यांच्या जिज्ञासू वृत्तीस चालना देणारे सायन्स सेंटर, नाविन्यपूर्ण संस्कृत प्रयोगशाळा यांच्या माध्यमातून शिक्षण घेत असल्याने विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता निश्चितच वाढत आहे आणि पालकही यामुळे अत्यंत समाधानी आहेत. ऑटोमॅटिक पॉवर जनरेटर, मिनरल वॉटर कूलर्स, इमर्जेन्सी फायर हायड्रन्ट व फायर एक्स्टीन्ग्युशर, ई-लर्निंग, सी.सी.टी.व्ही. कॅमेरे, विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीकरिता विविध परिसरांतून धावणाऱ्या २० बसेस, २.५ एकरचे प्रशस्त आणि सुसज्ज खेळाचे मैदान यामुळे दरवर्षी अनेक विदयार्थी एस.एस.सी. व एच.एस.सी. बोर्ड परीक्षेत ९० % पेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण होतात, तसेच खेळातही विदयार्थी राज्य व राष्ट्रीय पातळीवर उत्तुंग यश मिळवतात आणि विद्यालयाचे नाव उज्ज्वल करतात. अशा अनन्यसाधारण व्याक्तीमत्वास सर्व शिक्षकांच्या वतीने त्यांच्या अभिष्टचिंतनप्रसंगी शुभेच्छा देण्यात आल्या.
शिक्षकांच्या वतीने आण्णांचा यथोचित सत्कार करण्यात आला. विद्यालयातील शिक्षिकांनी आण्णांचे औक्षण केले आणि औपचारिकरित्या केक कापून आण्णांनी ८६ वा वाढदिवस साजरा करत ८७ व्या वर्षात दमदार पदार्पण केले. विद्यालयातील काही शिक्षकांनी प्रातिनिधिक स्वरूपात आपली शुभेच्छापर मनोगते मांडली आणि अशा संस्थेत सेवा करण्याची संधी मिळाल्याचे समाधान व्यक्त केले. अनेक वरिष्ठ स्नेही आणि पालकांनीही आण्णांची भेट घेऊन त्यांना उदंड आयुष्याकरिता मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या. मुख्याध्यापक बाळाराम पाटील, भाऊसाहेब पगार, अनिता भोर, उप-मुख्याध्यापक किसन आहिरे, पर्यवेक्षक दत्तात्रय भालेराव, लीला मुटकुळे, रमेश ढवळे, अविनाश सावंत यांनी कार्यक्रमाचे यशस्वी संयोजन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन आणि आभार प्रदर्शन विद्यालयाचे क्रीडाशिक्षक शब्बीर मोमीन यांनी केले.