- १४ एप्रिल ची बाबासाहेबांची जयंती अनुयायांनी घरीच साजरी करावी – अरुण चाबुकस्वार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ एप्रिल २०२०) :- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांनी महिलांच्या न्याय हक्कासाठी आणि सर्वांच्या शैक्षणिक हक्कासाठी दिलेला लढा प्रेरणादायी आहे. थोर समाजसुधारक आणि स्त्री शिक्षणाचे जनक महात्मा फुले यांचे कार्यच तसे अफाट होते.
आज शनिवारी (दि. ११) रोजी रहाटणीतील क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीबा फुले एज्युकेशन फाऊंडेशन संचालित, न्यू सिटी प्राईड स्कूलमध्ये सुरक्षित अंतर राखून क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. शाळेचे संस्थापक आणि सामाजिक कार्यकर्ते अरुण चाबुकस्वार यांच्या हस्ते महात्मा फुलेंच्या फोटोस पुष्पहार अर्पण करुन, अभिवादन करण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकते अंबादास काटे उपस्थित होते.
येत्या १४ एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंतीदिन आहे. सध्या कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग चिंतेची बाब आहे. त्यामुळे नागरिकांनी अनावश्यक घराबाहेर न पडता, आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी व बाबासाहेबांच्या विचारांचे अनुसरण करुन, सर्व अनुयायांनी बाबासाहेबांचा यावर्षीचा जयंतीदिन घरी राहूनच साजरा करावा, असे आवाहन देखील चाबुकस्वार यांनी यावेळी केले.