- देहूरोड च्या दोन्ही मुली कोरोनामुक्त; तर माळवाडीत नर्सला कोरोनाची लागण…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ मे. २०२०) :- देहूरोड येथील शिवाजीनगर परिसरातील एक पाच वर्षे व दुसरी ११ वर्षे वयाची मुलगी येरवडा, पुणे येथे नातेवाईकांकडे मागील ३ आठवड्यांपूर्वी गेली होती. त्या मुलींची कोरोना तपासणी केली असता, त्या मुली कोरोनाबाधित असल्याचे सिद्ध झाले होते.
पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात त्या दोन्ही मुली उपचार घेत होत्या. त्यांची आज सोमवारी घेतलेली चाचणी निगेटिव्ह आल्याने आज त्या दोघींना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे देहूरोड शहर कोरोनामुक्त झाले आहे.
तसेच आज मावळातील माळवाडी येथे वास्तव्यास असणारी व पुण्यातील शिवाजीनगर येथे खासगी रुग्णालयात परिचारिका असणाऱ्या महिलेला कोरोनाची बाधा झाली आहे. काही दिवसांपूर्वी तळेगाव येथे आढळलेली कोरोनाग्रस्त परिचारिका व माळवाडी येथील ही परिचारिका या दोन्ही परिचारिका एकाच रुग्णवाहिकेमधून प्रवास करीत होत्या. त्यामुळे या परिचारिकेला तळेगावच्या महिलेच्या संपर्कात आल्याने कोरोनाची लागण झाली आहे.