न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ मे २०२०) :- देहूरोड कॅन्टोन्मेंट हद्दीस प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले होते. हा आदेश १७ मेपर्यंत लागू होता. दरम्यान, हद्दीत कोणताही कोरोनाबाधित रुग्ण आढळलेला नाही. त्यामुळे १८ मेपासून येथील प्रतिबंधित क्षेत्र वगळण्याचा निर्णय कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाने घेतला.
त्यानुसार स्टेशनरी आणि जनरल स्टोअर्स, लॉंड्री, ऑप्टिकल, झेरॉक्स आणि फोटो स्टुडिओ ही दुकाने सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. यामध्ये स्टेशनरी आणि जनरल स्टोअर्स सोमवार, बुधवार आणि शुक्रवार, तर लॉंड्री, ऑप्टिकल, झेरॉक्स आणि फोटो स्टुडिओ ही दुकाने मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.
राज्य शासनाच्या आदेशान्वये अत्यावश्यक सेवेतील मेडिकल दुकाने, रुग्णालये , दवाखाने, बँका, गॅस एजन्सी, रेशनींग दुकाने, पेट्रोल पंप पुढील शासकीय आदेश येईपर्यंत सुरु राहतील, असे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सुधारित आदेशात नमूद करण्यात आले आहे.