- शहरातील एका पोलिसाला कोरोनाची लागण; पॉझिटिव्ह पोलिसांची संख्या ८ वर…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ मे २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात आज सकाळ व दुपारच्या सत्रात २९ जणांना कोरोनाची लागण झालेली आहे. यात १४ पुरुष व पंधरा महिलांचा समावेश आहे. तसेच पिंपरी चिंचवडमधील आणखी एका पोलिसाला करोनाची लागण झाली असून, शहरातील पॉझिटिव्ह पोलिसांची संख्या ८ वर पोहोचली असून एका पोलीस अधिकाऱ्याला उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे.
पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील येरवड्यातील एका पुरुषाला व एका महिलेला तसेच राजगुरुनगर परिसरातील एका पुरुषाला देखील कोरोनाची बाधा झालेली आहे. तसेच येरवड्यातील एका महिलेचा महापालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरु असताना मृत्यू झालेला आहे.
दरम्यान आज पिंपरी चिंचवड शहरातील कोरोनाने बाधित झालेले रुग्ण किवळे, आनंदनगर, पिंपरीतील भाटनगर व बौद्धनगर तसेच सांगवी परिसरात वास्तव्यास आहेत. त्यामुळे शहरातील सकारात्मक कोरोना रुग्णांची संख्या ३८२ वर पोहोचली आहे. महापालिकेच्या रुग्णालयात १८२ रुग्ण उपचार घेत असून आजपर्यंत ७ जणांचा मृत्यू झालेला आहे. तर, शहरातील १७० रुग्ण कोरोनामुक्त झालेले आहेत.