न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ मे. २०२०) :- आनंदनगरमध्ये सध्या कोविड रुग्णांची संख्या वाढत आहे. आनंदनगरप्रमाणे महात्मा फुलेनगर, लांडेवाडी या ठिकाणी व शहरातील वसाहतीमध्ये लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे. आनंदनगरमध्ये ज्या वेगाने रुग्णसंख्या वाढली आहे, त्या प्रकारे संसर्ग झाल्यास महात्मा फुलेनगर, लांडेवाडीची व पर्यायाने शहराची देखील अशीच अवस्था झाल्याशिवाय राहणार नाही.
जगात कोरोनावर कोणतेही औषध उपलब्ध नाही. या आजारावर वेळेपुर्वी काळजी घेतल्यास परिस्थिती आटोक्यात येण्यास मदत होईल. झोपडपट्टीतील नागरिकांमध्ये कोरोना बाबतीत माहिती व गांभीर्य नसल्याने त्याचे दुष्परिणाम सर्वच शहराला भोगावे लागतील. शहरातील झोपडपट्ट्यामध्ये कोरोनाचा विस्फोट होण्यापूर्वी महापालिकेने यावर नियंत्रण आणणे गरजेचे आहे.
त्यामुळे महापालिकेने तात्पुरत्या स्वरूपात महात्मा फुलेनगर, लांडेवाडी या ठिकाणी व शहरातील सर्वच झोपडपट्ट्यामध्ये तात्पुरती आरोग्य तपासणी केंद्र सुरू करावीत. उपाय योजना करावी, जेणेकरून वेळेपुर्वीच संशयित रुग्णांना ओळखून त्यांच्यावर उपचार करण्यास मदत होईल. त्यामुळं झोपडपट्ट्यामधील होणारा कोरोनाचा उद्रेक रोखता येईल, अशी मागणी माजी नगरसेवक तथा शिवसेना युवासेना पुणे जिल्हा समन्वयक जितेंद्र ननावरे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.