- ३० जून रोजी हेलिकॉप्टर किंवा बसने होणार पंढरपूरला रवाना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२. जून. २०२०) :- जगदगुरु संत तुकाराम महाराज यांचा ३३५ वा पालखी सोहळा आज देहूत पार पडला. अगदी मोजक्या प्रतिनिधींच्या उपस्थित पालखीने प्रस्थान ठेवले. प्रदक्षिणा घालून पादुका मुख्य मंदिरात ठेवल्या जाणार आहेत. त्यानंतर ३० जून रोजी हेलिकॉप्टर किंवा बसमधून पंढरपूरला रवाना होणार असल्याचं देवस्थानाकडून सांगण्यात आले आहे.
चांदीच्या पादुकांचे पूजन खासदार श्रीरंग बारणे, आमदार सुनील शेळके, मानकरी विक्रम महाराज माळवे, भागीरथी माता दिंडीचे विणेकरी बाळासाहेब गाडे, संभाजी महाराज समाधी मंदिर दिंडीचे विणेकरी हनुमंत शिवले यांच्या उपस्थितीत झाले.
पूजनानंतर पादुका विविधरंगी फुलांनी सजविलेल्या पालखीमध्ये ठेवण्यात आल्या. या वेळी उपस्थित वारकऱ्यांनी जयघोष केला. त्यानंतर टाळ – मृदंगाच्या गजरात आणि वैभवशाली थाटात सामाजिक अंतराच्या नियमांचे पालन करीत पालखीने मंदिर प्रदक्षिणा पूर्ण केली. संस्थानचे अध्यक्ष मधुकर मोरे यांच्या हस्ते आरती झाली. त्यानंतर उपस्थितांचे आभार व्यक्त करीत प्रस्थान कार्यक्रमाचा समारोप झाला. पालखी प्रदक्षिणा झाल्यानंतर पालखी मुख्य मंदिरात विसावणार असून ३० जून रोजी हेलिकॉप्टर किंवा बसने पंढरपूरला रवाना होणार आहे.