न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५. जून २०२०) :- विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळांमध्ये आज सोमवार (दि. १५) पासून ऑनलाइन अभ्यासक्रमाद्वारे शैक्षणिक वर्षाला सुरुवात होणार आहे. तसेच आजपासूनच सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक तसेच पोषण आहाराचे वाटप करण्यात येणार आहे.
वर्ग शिक्षकांनी विद्यार्थ्यांचा ऑनलाइन अभ्यासक्रम कसा घ्यावा यासाठी शाळेतील तंत्रस्नेही शिक्षकांची व स्वयंसेवकांची मदत घेण्यात येणार आहे. त्या मदतीने या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. सर्व माध्यमाचे ई साहित्य तयार केले असून, कम्युनिटी रेडिओ, स्थानिक केबल नेटवर्क, दूरदर्शनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यात येणार आहे.
आजपासून शाळेला सुरुवात होणार नसली तरी शैक्षणिक वर्षाची सुरवात होणार आहे. त्यामुळे, विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक व पोषण आहाराचे वितरण करण्यासाठी शाळेत बोलविण्यात येणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांची गर्दी होणार नाही याची जबाबदारी मुख्याध्यापकांकडे देण्यात आली आहे, अशी माहिती महापालिकेचे माध्यमिक शिक्षण अधिकारी पराग मुंडे यांनी दिली आहे.