- बिहारच्या माजी खासदाराचा दावा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५. जून २०२०) :- अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. मात्र, बिहारमधील माजी खासदार आणि जन अधिकार पक्षाचे नेते पप्पु यादव यांनी सुशांतच्या आत्महत्येसंदर्भात खळबळजनक दावा केला आहे. सुशांत सिंह राजपूत हा कधीही आत्महत्या करू शकत नाही. त्याची हत्या करण्यात आली आहे,” असं पप्पु यादव यांनी म्हटलं आहे.
सुशांत सिंह राजपूत यांच्या कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर पप्पु यादव यांनी माध्यमांशी संवाद साधला. “सुशांत सिंह राजपूत याची हत्या करण्यात आलेली आहे. तो कधीही आत्महत्या करू शकत नाही. या घटनेची सीबीआयकडून चौकशी करण्यात यावी, अशी मी मागणी करतो,” असं यादव यावेळी म्हणाले.
सुशांतच्या आत्महत्येची माहिती मिळाल्यानंतर पप्पु यादव यांनी पाटणा येथे जाऊन सुशांतच्या वडिलांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी ट्विटही केलं आहे. “बिहारचा गौरव असलेला सुशांत सिंह राजपूत आत्महत्या करू शकत नाही. त्याच्या मृत्यूची सीबीआय चौकशी व्हायला हवी. पाटणातील त्याच्या घरी जाऊन सुशांतच्या वडिलांची भेट घेतली. त्यांची मागणी आहे की, याची सीबीआय चौकशी व्हायला हवी. त्यांचं म्हणणं आहे की,’ घटनेच्या दोन तासाआधी त्यांचं सुशांतसोबत बोलणं झालं होतं. आत्महत्या करण्यासारखी कोणतही कारण नव्हतं. कुटुंबीयांना भेटून भावना विवश झालो आहे,” असं ट्विट पप्पू यादव यांनी केलं आहे.