न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ जून २०२०) :- मावळ तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह सापडलेल्या ४५ रुग्णांपैकी दोन जणांचा दुदैवी मृत्यु झाला आहे. मंगळवारी रात्री लोणावळ्यातील वलवण गावात राहणाऱ्या ५६ वर्षीय महिलेचा यशवंतराव चव्हाण रुग्णालयात तर आज बुधवारी सकाळी ओळकाईवाडी, कुसगाव येथे राहणाऱ्या डॉक्टरांचा मंगेशकर रुग्णालयात मृत्यू झाला.
सुरक्षित समजल्या जाणाऱ्या मावळ तालुक्यात कोरोनाची लागण वाढत असताना दोन जणांचे मृत्यू झाल्याने तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वलवण येथिल मयत झालेली महिला दुबईहून गोवा व गोव्यातून लोणावळ्यात आली होती. ओळकाईवाडी येथील डॉक्टरांनी कोठेही प्रवास केला नव्हता. त्यांचे हिमोग्लेबिन कमी झाल्याने पुण्यातील मंगेशकर रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते . तेथेच त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला व आज सकाळी दुदैवी मृत्यू झाला.
तर, लग्न सोहळ्याहून परतलेल्या तळेगाव स्टेशन येथील एकाच कुटुंबातील चारजणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यांचा कोरोना पॉझिटिव्ह चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती तळेगाव दाभाडे प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. प्रवीण कानडे यांनी दिली. तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीत आजपर्यंत एकूण १३ कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तींची नोंद झाली असून त्यातील दोघांनी कोरोनावर मात केली असल्याची माहिती मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांनी दिली.