न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. 20. जुन 2020) :- लग्न सोहळ्यात सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन न करणाऱ्या आणि 50 व्यक्तींची परवानगी असताना अधिक व्यक्ती लग्नात आढळल्याने , वधूच्या चुलत्यासह हॉटेल चालकावर मावळ तालुक्यातील वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे .
शुक्रवार ( दि . 19 ) दुपारी 12 च्या सुमारास येथील हॉटेल श्रीकृष्ण व्हेज ट्रीट येथे ही घटना घडली . याप्रकरणी पोलीस कर्मचारी संदीप घोटकर यांनी फिर्याद दिली आहे . राहुल रघुनाथ वरघडे ( वय 32 , रा . आर्डव , ता . मावळ ) आकाश अनिल राऊत ( वय 26 , रा . माळीनगर , वडगाव , ता . मावळ ) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे . वडगाव ( ता . मावळ ) येथील हॉटेलमध्ये विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते .
या विवाह सोहळ्याला पोलिसांकडून 50 व्यक्तींसह रीतसर परवानगी देण्यात आली होती . यासाठी पोलीस ठाण्यात अर्जही करण्यात आला होता . मात्र शासनाने घालून दिलेल्या अटी आणि शर्तीचे पालन करून विवाह होत आहे का हे पाहण्यासाठी पोलीस उप निरीक्षक दिलीप देसाई व होमगार्ड अनिकेत बो-हाडे आदी कर्मचाऱ्यांनी विवाहस्थळी भेट दिली . यादरम्यान , विवाहाच्या स्थळावर नियमांची पायमल्ली करत 60 ते 70 जण लग्नास उपस्थित होते . तसेच सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे ही पालन होताना पोलिसांना दिसले नाही . त्यामुळे नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी वधूचे चुलते राहुल वरघडे आणि हॉटेलचे मॅनेजर आकाश अनिल राऊत यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे .