न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. 26. जून. 2020) :- सध्या शहरात करोनाचा उद्रेक सुरू आहे . परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी पिंपरी – चिंचवड महापालिकेचे पदाधिकारी , गटनेते आणि अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीत महापौर उषा ( माई ) ढोरे यांनी सांगितले की , महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती ( वायसीएम ) रुग्णालय कोरोना चाचणी यंत्रणा येत्या आठ दिवसांत सुरू केली जाणार आहे. करोना संशयित रुग्ण तपासणी व कंटन्मेंट झोन निश्चित करणे, कंटेनमेंट झोन रद्द करणे यासाठी क्षेत्रीय समितीनिहाय पथके तयार करावीत, अशा सूचनाही त्यांनी दिल्या .
यावेळी महापौर ढोरे म्हणाल्या की , 8 क्षेत्रीय कार्यालयानुसार कोरोना संदर्भात कामकाजाची विभागणी केल्यास वायसीएम रुग्णालयावर येणारा ताण कमी होण्यास मदत होणार आहे.
करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालिका पदाधिकारी , गटनेते व अधिका-यांची बैठक गुरूवारी (दि. 25) पालिकेतील मधुकरराव पवळे सभागृहात झाली. त्या बैठकीत महापौरांनी वरील आदेश दिले.
बैठकित उपमहापौर तुषार हिंगे , स्थायी समिती अध्यक्ष संतोष लोंढे , पक्षनेते नामदेव ढाके , विरोधी पक्षनेते नाना काटे , मनसे गटनेते सचिन चिखले , अपक्ष गटनेते कैलास बारणे , नगरसेवक सागर आगोळकर , तुषार कामठे , शशिकांत कदम , नगरसेविका शर्मिला बाबर , योगिता नागरगोजे , अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील , अजित पवार , प्रवीण तुपे , आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ . के . अनिल रॉय , अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ . पवन साळवे , वायसीएमचे अधिष्ठाता डॉ . राजेंद्र वाबळे , डॉ . वर्षा डांगे यांच्यासह क्षेत्रीय अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली . लॉकडाऊन शिथिल केल्याने नागरिकांची शहरात वर्दळ वाढल्याने पूर्वीच्या तुलनेत झपाट्याने रुग्ण संख्या वाढू लागली आहे . यावर उपाययोजना म्हणून पालिकेच्या वतीने शहरात 7 ठिकाणी कोविड केयर सेंटर व 4 ठिकाणी डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटर सुरु करण्यात आले आहे . याशिवाय शासनाच्या निर्देशानुसार शहरातील खासगी रुग्णालयातील 80 टक्के बेड राखीव ठेवण्यात आले आहे.