न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपळे सौदागर (दि. ०२. जुलै. २०२०) :- पिंपळे सौदागर येथील वैकुंठवासी हभप पांडुरंग काटे प्रतिष्ठान संचालित पी. के. इंटरनॅशनल इंग्लिश स्कूलमध्ये दिंडी सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला.
आषाढी एकादशीनिमित्त शाळेमध्ये दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी शाळेतील शिक्षक, कर्मचाऱ्यांनी ‘ ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानराज माऊली तुकाराम व आषाढाची वारी, सज्ज झाले वारकरी, अवघी दुमदुमली पंढरी, विठोबाच्या नामगजरी ‘, असा जयघोष केला. शासकीय नियमांचे पालन करून हरिनामाचा गजर केला. शाळेचे संस्थापक-अध्यक्ष जगन्नाथ काटे यांच्या हस्ते विठ्ठल-रुख्मिणी व पालखीची पूजा तसेच आरती करण्यात आली.
संस्थापक जगन्नाथ काटे म्हणाले की, शाळेच्या वतीने वर्षभर विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शालेय उपक्रमांबरोबरच सांस्कृतिक कार्यक्रम तसेच क्रीडा सप्ताहाचे आयोजन केले जाते. सध्याच्या करोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा आषाढी एकादशीला विद्यार्थ्यांच्या सहभागातून दिंडी न काढता शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत शाळेच्या प्रांगणातच नियमांचे पालन करून परंपरा जोपासत रिंगण पार पाडले.