न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपळे सौदागर (दि. ०२. जुलै. २०२०) :- पिंपरी – चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर हे कोरोना पॉझिटिव्ह भाजपचे शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांच्या संपर्कात आल्याने होम क्वारंटाईनमध्ये आहेत. त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. दक्षता म्हणून त्यांनी पाच दिवस घरातून कामकाज करण्याचा निर्णय घेतला आहे.
आ. लांडगे यांच्या संपर्कात आयुक्त आले होते. त्यामुळे त्यांनी स्वत:ला होम क्वारंटाईन करून घेतले आहे. त्याचा कोरोना अहवाल मंगळवारी (दि. ३०) रात्री उशीरा निगेटिव्ह आला आहे. दक्षता म्हणून त्यांनी आपल्या निवासस्थानावरून पालिकेचे कामकाज करण्याचा निर्णय घेतला आहे. सुमारे ५ दिवस ते घरातून काम करणार आहेत.
दरम्यान, पालिका भवनातील चौथ्या मजल्यावरील त्याचे दालन बंद करण्यात आले आहे. ते निर्जंतूक करून घेण्यात आले आहे. आयुक्तांच्या निवासस्थानावरील सुरक्षा रक्षकालाही कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच, सहायक आयुक्तांच्या वाहनावरील चालकासही कोरोना झाला आहे. आतापर्यंत पालिकेचे ३० पेक्षा अधिक अधिकारी व कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत. तसेच, काळेवाडीतील एका नगरसेविकेचा पती आणि भोसरीतील एक माजी नगरसेवक कोरोना पॉझिटिव्ह झाला आहे. तसेच, चिंचवडमधील एका माजी नगरसेवकांच्या नातेवाईकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.