न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२. जुलै. २०२०) :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिका पवना नदीवरील रावेत-पुनावळे येथील बंधा-यातून से.क्र.२३. निगडी येथील जलशुद्धीकरण केंद्रामध्ये शुद्धीकरणाकरिता पाणी नेण्यासाठी पंपिंग द्वारे दैनंदिन उपसा करीत आहे. सदर पाण्यावर शुद्धीकरणाची प्रक्रिया करून ते संपूर्ण पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात पिण्यासाठी व घरगुती वापरासाठी पुरविण्यात येते.
नदी स्वच्छ राखणे, विशेषतः पेयजल उद्भव स्वच्छ राखणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. त्या दृष्टीने महानगरपालिकेने ‘’बंधारा व नदीकाठ येथे अंघोळ करणे, जनावरे धुणे, कपडे तसेच वाहने धुणे इ. बाबींना मनाई असलेबाबतचे फलक रावेत तसेच पुनावळे येथे बंधा-याच्या दोन्ही बाजूस नदी काठावर लावले आहेत”, तरीसुद्धा, सदर रावेत-पुनावळे बंधा-यामध्ये नागरिक आंघोळ करतात, जनावरे धुतात, कपडे तसेच वाहने धुतात अशा प्रकारच्या तक्रारी महानगरपालिकेकडे येत आहेत.
या पार्श्वभूमीवर पाहणी केली असता, उपरोक्त प्रमाणे परिस्थिती दिसून येत आहे. यामुळे आपल्या शहराच्या पेयजलाच्या उद्भवाच्या प्रदुषणात वाढ होत आहे, ही बाब गंभीर आहे. तरी, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम मधील कलम ३१०,३११ व ३१२ चे अनुषंगाने सर्व नागरीकांना सुचित करण्यात येते की, “रावेत-पुनावळे येथील बंधारा व नदीकाठ या ठिकाणी अंघोळ करणे, कपडे धुणे, जनावरे तसेच वाहने धुणे इ. बाबींना सक्त मनाई आहे”, सदर मनाईचे कोणी उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करणेत येईल, असे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.