- स्वतंत्र कोविड लॅबला परवानगी मिळाल्यामुळे उद्यापासून रुग्णांची संख्या वाढणार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२. जुलै. २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात आज गुरुवारी (दि. ०२ जुलै) रोजी ३१४ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. आज पिंपरी चिंचवड शहराच्या हद्दीबाहेरील पुण्यातील गोखलेनगर येथील एका वयोवृद्ध महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे.
शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या ३५४४ वर पोहोचली आहे. महापालिका रुग्णालयात १३६४ रुग्ण उपचार घेत असून, महापालिका हद्दीतील रहिवाशी परंतु, इतर ठिकाणी उपचार घेत असणाऱ्या रुग्णांची संख्या ०८ वर पोहोचली आहे. तर, आजपर्यंत शहरातील एकूण ४७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या २१५४ वर पोहोचली आहे. आज पालिकेने शहरातील कोरोनाने प्रभावित झालेल्या व मुक्त झालेल्या रुग्णांच्या परिसराची माहिती दिलेली नाही.
तसेच पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात स्वतंत्र कोविड लॅब सुरु झाली आहे. आयसीएमआर’च्या मान्यतेने उद्यापासून ( शुक्रवार ) वायसीएममध्ये कोरोना तपासणी केली जाणार आहे. आरटीपीसीआर टेस्टिंग युनिटची क्षमता दिवसाला ३७६ आहे. सुरुवातीला २० ते ४० स्वॅबची तपासणी होईल. काही दिवसांनी पूर्ण क्षमतेने तपासणी चालू होईल. त्यानंतर दोन तासात ९६ रुग्णांची तपासणी होईल. यामुळे रिपोर्ट प्रलंबित राहण्याचे प्रमाण घटेल, असे महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले. मुंबई आणि ठाणे महापालिकांबरोबरच पिंपरी – चिंचवड महापालिकेलाही लॅब सुरु करण्याचा बहुमान मिळाला आहे. राज्यातील ही तिसरीच महापालिका ठरली आहे.