न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ जुलै. २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरातील दुकाने सुरू ठेवण्यासाठी आता सकाळी ९ ते सायंकाळी ५ ही वेळ निश्चित करण्यात आली आहे. प्रतिबंधित क्षेत्रामध्ये (कन्टेन्मेंट झोन) मात्र सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत दूध, भाजीपाला, फळे, अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तू आदींची विक्री सुरू ठेवण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. आयुक्तांच्या सुधारित आदेशानुसार अंमलबजावणी सुरू झाली आहे.
आयुक्त हर्डीकर यांनी सुधारित आदेश काढले. आदेशानुसार उद्योगांना १०० टक्के, खासगी कार्यालयांना ५० टक्के तर, माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील उद्योगांना ५० टक्के मनुष्यबळासह उद्योग सुरू ठेवता येणार आहेत. अत्यावश्यक आणि वैद्यकीय सेवा वगळता रात्री ९ ते सकाळी ५ या वेळेत संचारबंदी लागू राहणार आहे.
आयुक्तांनी काही भागांमध्ये सम – विषम तारखेनुसार दिवसाआड दुकाने उघडण्याचे आदेश दिले आहेत. चिंचवड स्टेशन, पिंपरी कॅम्प, साई चौक, शगुन चौक, गांधी पेठ, चापेकर चौक (चिंचवड), एम.एम.स्कूल ते काळेवाडी पूल, अजमेरा (पिंपरी), मोशी चौक, मोशी-आळंदी रस्ता, महाराणा प्रताप चौक, निगडी बसथांबा, डांगे चौक ते काळेवाडी फाटा, भोसरी आळंदी रस्ता, कावेरीनगर मार्केट, कस्तुरी मार्केट, थरमॅक्स चौक ते साने चौक, दिघी जकात नाका ते मॅगझीन चौक, साईबाबा मंदिर या परिसराचा त्यामध्ये समावेश आहे.