न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ जुलै. २०२०) :- दुकानास आग लावून दीड हजार रुपये चोरून नेणाऱ्या तीन चोरट्यांना पिंपरी पोलिसांनी अटक केली. ही घटना मंगळवारी (दि. ३०) मध्यरात्री दीडच्या सुमारास रिव्हर रोड, पिंपरी येथे घडली.
सुर्यकांत अनंत माने (२६, रा. निराधारनगर, पिंपरी), कमलकिशोर रमेश भट (वय ३१), सोनू द्वारिकाप्रसाद सोंधीया (२१, दोघे रा. भारतनगर, पिंपरी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी प्रकाश पन्नाराम गेहलोत (३८, रा. पिंपरीगाव) यांनी बुधवारी (दि. १) पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिस उपनिरीक्षक रमेश केंगार यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गेहलोत यांचे रिव्हर रोड, पिंपरी येथे दुकान आहे. आरोपींनी मध्यरात्री दीडच्या सुमारास शटर उचकटून दुकानात प्रवेश केला. अंधारात काडी पेटवून गल्ला शोधला. पेटविलेली काडी खाली टाकल्याने लागलेल्या आगीत दुकानातील डेकोरेशन, बर्थडे साहित्य, मेणबत्त्या, कागदी पेपर असे एकूण ३ लाख रुपयांचे साहित्य जळून खाक झाले. आरोपींनी दुकानाच्या गल्ल्यातील दीड हजार रुपये चोरून नेले. आरोपींना पळून जाताना काही नागरिकांनी पाहिले. पोलिसांनी आरोपींचा माग काढून त्यांना अटक केली.