न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ जुलै. २०२०) :- महाराष्ट्रातील शैक्षणिक संस्थामध्ये सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षाकरिता शुल्क वाढ न करण्याबाबत आणि शैक्षणिक फी भरण्याबाबत पालकांना तगादा लावू नये, असे राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे आदेश आहेत. तरी देखील शहरातील शैक्षणिक संस्था पालकांना ऑनलाईन शिक्षणाच्या नावाखाली फी भरण्याबाबत सक्ती करीत आहेत. अशा शिक्षण संस्थाचालकांच्या दबावामुळे त्रस्त झालेल्या पालकांनी पिंपरी चिंचवड मनपाच्या शिक्षण मंडळातील अधिका-यांशी किंवा पिंपरी चिंचवड शहर युवक कॉंग्रेसच्या पदाधिका-यांशी संपर्क साधावा, असे आवाहन राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे शहराध्यक्ष विशाल वाकडकर यांनी केले आहे.
ताथवडे (वाकड) येथील इंदिरा नॅशनल स्कूल व्यवस्थापनाने अशा पध्दतीने काही विद्यार्थ्यांच्या पालकांना फी भरण्याबाबत तगादा लावला होता. ज्या पालकांनी फी भरली नाही अशा विद्यार्थ्यांचे संस्थेने ऑनलाईन ‘पासवर्ड व लॉगिन आयडी’ बंद केले होते. त्यामुळे या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण मिळत नव्हते. त्यांना शिक्षणाच्या सुविधापासून वंचित ठेवले जात होते. अशा त्रस्त पालकांनी या शिक्षण संस्थेविरुध्द राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या पदाधिका-यांकडे तक्रार केली होती.
या तक्रारीची दखल घेत विशाल वाकडकर यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी युवकचे शहर उपाध्यक्ष मयूर जाधव, सरचिटणीस चेतन फेंगसे यांनी पालकांच्या वतीने महापालिकेच्या शिक्षण मंडळाच्या प्रशासन अधिकारी जोत्स्ना शिंदे यांच्याकडे तक्रार केली. यानंतर शिक्षण मंडळाचे तक्रार निवारण अधिकारी तथा पर्यवेक्षक विलास पाटील यांनी पालक प्रतिनिधी आणि युवक राष्ट्रवादीचे पदाधिकारी यांच्या समवेत गुरुवारी (दि. २ जूलै) इंदिरा इंटरनॅशनल स्कूलच्या पर्यवेक्षकांसमवेत बैठक घेतली. या बैठकीत शासनाच्या आदेशाबाबत शाळा पर्यवेक्षकांना समज दिली व ज्या विद्यार्थ्यांनी फी भरली नाही. अशा विद्यार्थ्यांचे ‘लॉगिन आयडी व पासवर्ड’ पुढील बारा तासात सुरु करावेत व कोणत्याही विद्यार्थ्याला शिक्षणापासून वंचित ठेवू नये, असे आदेश विलास पाटील यांनी दिले आहेत. तसा शेरा शाळेच्या ‘व्हिजीट बुक’ मध्ये नोंदविला आहे.
आज शुक्रवारी इंदिरा नॅशनल स्कूल व्यवस्थापनाने सर्व विद्यार्थ्यांचे लॉगिन आयडी व पासवर्ड पुन्हा सुरु केले आहेत. अशी माहिती शिक्षण मंडळाचे तक्रार निवारण अधिकारी तथा पर्यवेक्षक विलास पाटील यांनी दिली. राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या पदाधिका-यांनी व शिक्षण मंडळाच्या अधिका-यांनी घेतलेल्या या भुमिकेमुळे पालकांना व विद्यार्थ्यांना न्याय मिळाला असल्याबद्दल पालक प्रतिनिधींनी समाधान व्यक्त केले.