- वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येवर नियंत्रण मिळवा अन्यथा परिणाम भोगा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ जुलै. २०२०) :- ‘मुंबईमध्ये कोरोनाची संख्या नियंत्रणात येऊ शकते, मग पुण्यात काय अडचण आहे. मी तुम्हाला आता एकदाच सांगतोय, मला परत सांगायला लावू नका, नाही तर परिणाम भोगावे लागतील’. अशा स्पष्ट शब्दात उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी सर्व वरिष्ठ अधिका-यांची चांगलीट खरडपट्टी काढली. विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये शुक्रवार (दि. ३) रोजी अजित पवार यांच्या उपस्थितीत कोरोना संदर्भात बैठक घेण्यात झाली. यावेळी बैठकीत जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येबाबत चिंता व्यक्त करण्यात आली. सध्या करण्यात येत असलेल्या उपाय योजनांबाबत पवारांनी नाराजी देखील व्यक्त केली.
यावेळी बैठकीला मुख्यमंत्री यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीपकुमार व्यास, वैद्यकीय शिक्षण, अन्न व औषध विभागाचे सचिव संजय मुखर्जी, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, जमाबंदी आयुक्त एस. चोक्कलिंगम, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुणे मनपा आयुक्त गायकवाड, पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर, पोलीस आयुक्त डी. के. व्यंकटेशम, संदीप बिष्णोई यांच्यासह संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत अजित पवार यांनी दोन्ही महापालिका आयुक्तांसह, ग्रामीण पोलिस यांना चांगलेच धारेवर धरले.
अजित पवार म्हणाले, लॉकडाऊन शिथील झाले म्हणजे यंत्रणेची जबाबदारी संपली असे होत नाही. नागरिक सर्रास मोठ्या प्रामाणात मास्क न लावता फिरत आहेत. लग्रामध्ये उपस्थित राहणाऱ्या लोकांवर कोणाचे निर्बंध राहिले नाहीत. अनेक ठिकाणी सुरक्षित सामाजिक अंतर राखले जात नाही. असे असताना अपेक्षित कारवाई होताना दिसत नाही. यामुळे गेल्या काही दिवसांत जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढली आहे. प्रतिबंधित क्षेत्रात शासनाच्या निर्देशानुसार कडक अंमलबजावणी करा, मास्क व नियमांचे पालन न करणा-यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश देखील पवार यांनी दिले.
दरम्यान, कोरोना रुग्णाची संख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी चाचण्याचे प्रमाण वाढवा, यासाठी दोन्ही महापालिका आणि ग्रामीण भागासाठी तातडीने स्वतंत्र टेस्टींग इन्चार्ज म्हणून स्वतंत्र आयएएस अधिका-याची नियुक्ती करा, असे निर्देश देखील त्यांनी संबंधित अधिका-यांना दिले. कोविड रुग्णावर उपचार करताना नॉन कोविड रुग्णाकडे दुर्लक्ष होणार नाही हे लक्षात ठेवा. तसेच अनेक रुग्णालयामध्ये डॉक्टर कोविड कक्षामध्ये जात नसल्याच्या तक्रारी येत आहे. अशा डॉक्टरवर तातडीने कारवाई करा, असे आदेश देखील पवार यांनी दिले.