न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७. जुलै. २०२०) :- देहू परिसरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने ग्रामस्थांच्या मागणीनुसार ग्रामपंचायत प्रशासनाने विशेष बैठक घेऊन बुधवार (ता. ८) पासून चौदा दिवसांचा लॉकडाऊन (जनता कर्फ्यू) करण्याचा निर्णय घेतला आहे.
ग्रामविकास अधिकारी अर्जुन गुडसूरकर, जिल्हा परिषद सदस्या शैला खंडागळे, पंचायत समिती सदस्या हेमलत काळोखे, सरपंच पुनम काळोखे, उपसरपंच स्वप्नील काळोखे, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी किशोर यादव, देहूरोड पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक संतोष येडे, पोलिस पाटील सुभाष चव्हाण यांच्यासह सदस्य यावेळी उपस्थित होते.
देहू परिसरात मंगळवारपर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३७ वर पोहोचली असून १२ ठिकाणी मायक्रो कंटेन्मेंट झोन जाहीर करण्यात आला. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आजच्या बैठकीत रुग्णालये, शासकीय कार्यालये, मेडिकल, दूधविक्री मर्यादीत वेळेत सुरू ठेवण्याची सूट देण्यात आली आहे. ८ तारखेपासून पुढील १४ दिवस २१ जुलैपर्यंत संपूर्ण देहू लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. साठ वर्षावरील व्यक्तींनी घराबाहेर पडू नये. मॉर्निंग वॉक व शतपावली करणाऱ्या नागरिकांना मज्जाव करण्यात आला आहे.