न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३. जुलै. २०२०) :- लोकमान्य हॉस्पिटलच्या डॉक्टरला फोन करून रुग्णालयाकडे २५ लाख रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या बनावट पीए ला निगडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गोरगरिबांना मदत करण्याच्या नावाखाली संबंधित व्यक्तीने खंडणी मागितली होती. ताब्यात घेतलेल्या व्यक्तीकडे पोलीस कसून चौकशी करीत आहेत.
सौरभ संतोष अषटुल (वय २१, रा. गंजपेठ, पुणे) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून पोलिसांनी सिमकार्ड, मोबाईल फोन आणि एक दुचाकी असा एकूण 35 हजारांचा ऐवज ताब्यात घेतला आहे.
शहरातील लोकमान्य रुग्णालयास फोन करून मी भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या कार्यालयातून बोलत असल्याचे फोनवरील व्यक्तीने सांगितले होते. आम्हाला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गोरगरिबांना मदत करायची आहे. त्यासाठी मी माझा पर्वतीमधील कार्यकर्ता पाठवितो. त्याच्याकडे ते पैसे द्या. तसेच पैसे न दिल्यास बघून घेण्याची भाषाही फोनवरील त्या व्यक्तीने केली होती.
त्यानंतर निगडी पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करून आरोपी सौरभ याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याचे कबूल केले आहे. पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले असून न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.