न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८. जुलै. २०२०) :- भोसरी येथील मुलाणी पेट्रोल पंपाच्या खिडकीचे गज कापून चोरट्यांनी कपाटातील साडेसात लाख रुपयांची रोकड चोरून नेली होती. सीसीटिव्ही फुटेज कॅमेऱ्यावर चादर टाकून चोरटयांनी ही चोरी केल्याचे स्पष्ट झाले होते. भोसरी पोलिसांनी दोन तासात गुन्हा उघडकीस आणून साडेसात लाख रुपयांची रोकड चोरट्यांकडून हस्तगत केली होती.
नारायण अप्पा पवार (वय २६ वर्षे), रमेश प्रभू पवार ( वय २२ वर्षे) दोघेही रा. भारतमाता नगर, दिघी. मूळगाव पाटोदा, बीड) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
आरोपी नारायण हा मुलाणी पेट्रोल पंपावर काही महिन्यांपासून काम करत आहे. त्यानेच सर्व योजना करून पेट्रोल पंपाच्या ऑफिसमधील रोख रक्कम चोरायची आणि भाऊजीचे घेतलेले ८० हजार परत करण्याचे असे ठरवले होते. त्यानुसार पंपावर काम करत असताना प्रत्येक हालचालींवर नजर ठेवून,. दुसऱ्या पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या रमेशला सोबतीला घेऊन साडेसात लाख रुपये त्याने लंपास केले. अशा प्रकारे या गुन्ह्याचा उलगडा झाला.