न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१. जुलै. २०२०) :- गांजा विक्री करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. त्याच्याकडून तीन लाख ७ हजार ५०० रुपयांचा गांजा जप्त केला. पिंपरी – चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने बुधवारी (दि. २९) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ओटास्किम, निगडी येथे ही कारवाई केली.
राजेंद्र सुरेश पवार (२१, रा. सिद्धार्थनगर, पत्राशेड झोपडपट्टी, ओटास्कीम निगडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस नाईक संदीप पाटील यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पौळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी गांजा तस्करी करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहे. त्यानुसार, अंमली पदार्थ विरोधी पथक हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी पोलिस कर्मचारी संदीप पाटील आणि शाकीर जेनेडी यांना माहिती मिळाली की, ओटास्कीम येथील पेरूची बाग परिसरात एकजण गांजा विक्रीसाठी येणार आहे. त्यानुसार त्यांनी परिसरात सापळा रचून आरोपी राजेंद्र पवार याला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे ३ लाख ७ हजार ५०० रुपये किमतीचा १२ किलो ३०० ग्राम गांजा मिळून आला. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत महाले करीत आहेत.