- शरद पवारांनी स्वतः फोन करून केली आस्थेने विचारपूस…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७. ऑगस्ट. २०२०) :- पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती ( वायसीएम ) रूग्णालयातील एक महिला डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह झाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वत: फोन करून त्यांच्या तब्येतीची चौकशी केली. वायसीएम या कोरोना समर्पित रूग्णालयात रूग्ण सेवा करताना महिला डॉक्टर कोरोना संक्रमित झाल्या आहेत. त्यांच्यावर वायसीएम रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
रूग्ण सेवा करताना संक्रमण झाल्याची बाब शरद पवार यांना समजली. त्यांनी आपल्या व्यस्त दिनचर्येतून वेळ काढून रूग्णालय व पालिका प्रशासनाशी संपर्क साधला. आवश्यक इंजेक्शन व औषधे रूग्णास पुरविण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना केल्या. तसेच, संबंधित डॉक्टरांशी फोनवरून चर्चा केली. तुम्ही लवकरच बरे व्हा आणि कामाला लागा, असा सल्ला पवार यांनी त्यांना वडिलकीच्या नात्याने दिला. या संवादाची ऑडिओ क्लिप सोशल मीडियात व्हायरल झाली आहे.
दरम्यान मृत व्यक्तीला करोना झाला होता, याबाबतची माहिती न दिल्याने मृत व्यक्तीचे शवविच्छेदन करण्यात आले. यामुळे शवविच्छेदन करताना संपर्कात आल्याने वायसीएममधील पाच कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय करोनाबाधित झाले आहेत. शवविच्छेदन करताना डॉक्टरांपेक्षा कर्मचारी मृतदेहाच्या जास्त संपर्कात येत असतात. अशाच दोन करोनाबाधित असलेल्या मृतदेहांच्या संपर्कात आल्याने वायसीएम रुग्णालयातील १२ पैकी ५ कर्मचारी करोनाबाधित आले आहेत. तसेच या कर्मचाऱ्यांमुळे त्यांच्या संपूर्ण कुटुंबीयांनाही करोनाची बाधा झाली.