न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ ऑगस्ट २०२०) :- शेलारवस्ती येथील रवी इंडस्ट्रीज या कंपनीचा कंडेनसॅट टॅंक हा ६२ लाख ५४ हजार रुपये किमतीचा जॉब झारखंड येथील एनटीपीसी या कंपनीत वेळेत पोहचवितो, असे सांगून आरोपी यांनी विश्वास संपादन केला. आरोपी यांनी संगनमत करून गाडी भाड्याची रक्कम वेळोवेळी वाढवून त्यासाठी फिर्यादी यांच्या कंपनीकडे २१ लाख ७५ हजार रुपयांची मागणी केली. पैसे दिले नाही तर जॉब विकून टाकू, अशी भिती दाखवून जॉबची स्वत:च्या फायद्यासाठी विल्हेवाट लावून फिर्यादी यांच्या कंपनीचे आर्थिक नुकसान केले.
हा प्रकार ३१ डिसेंबर २०१९ पासून ८ ऑगस्ट २०२० या कालावधीत घडला. आप्पासाहेब बाबूराव गायकवाड (वय ३४, रा. शाहूनगर, चिंचवड) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार, अजित भोसले, अजित सिंग, भोलाराम, प्रकाश अगरवाल (पूर्ण नाव, पत्ता माहीत नाही) यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.