- कोरोनामुळे यंदाचा गणेशोत्सव मंदिरामध्येच साजरा करणार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १०. ऑगस्ट. २०२०) :- पुणे शहरात दरवर्षी मोठ्या प्रमाणावर साजरा होणार्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती मंडळाने एक निर्णय घेतला आहे. यंदाचा गणेशोत्सव मंदिरामध्येच साजरा करण्याचे मंडळाने ठरवले आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
या पत्रकार परिषदेला महापौर मुरलीधर मोहोळ, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, पोलीस सहआयुक्त रवींद्र शिसवे तसेच मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी अशोक गोडसे म्हणाले की, शासनाने दिलेल्या आदेशानुसार आपण यंदाचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने आणि मुख्य मंदिरात साजरा करीत आहोत. मंदिराच्या बाहेरून भाविकांना दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच, दरवर्षी गणोशोत्सवात भाविक गणरायाच्या चरणी मोठ्याप्रमाणावर हार, फुले, नारळ आणि पेढे अर्पण करत असतात. मात्र यंदा या वस्तूंचा स्वीकार केला जाणार नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. गणरायाचे दर्शन घेण्यासाठी येणा-या भाविकांसाठी बेलबाग चौक आणि बुधवार चौक येथे एलईडी स्क्रिनची व्यवस्था करण्यात येणार आहे. याद्वारे भाविकांना लांबून देखील दर्शन घेता येईल. यंदाच्या गणेशोत्सवात प्रत्यक्ष कार्यक्रम करणे शक्य नसल्याने मंडळामार्फत ऑनलाईन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अथर्वशीर्ष या विषयावर प.पू. स्वानंदशास्त्री पुंड महाराज यांचे निरुपण, दिनांक ११ ते ३१ ऑगस्ट दरम्यान दररोज दुपारी ४ वाजता होणार आहे. याशिवाय स्वराभिषेक देखील दिनांक १८ ऑगस्टपासून सकाळी ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात आला आहे. श्रीं चे ऑनलाईन दर्शन घेण्याची व्यवस्था देखील ट्रस्ट मार्फत करण्यात आली असून वेबसाईट, अॅप, फेसबुक, यू ट्यूब, ट्ट्विटर या माध्यमांद्वारे उत्सवकाळात २४ तास दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे. तरी भाविकांनी ऑनलाईन दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन देखील अशोक गोडसे यांनी केले आहे.