- पिंपळे सौदागर येथील चॅलेंजर पब्लिक स्कुलमध्ये स्वातंत्र्यदिन साधेपणाने साजरा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५. ऑगस्ट २०२०) :- पिंपळे सौदागर येथील चॅलेंजर पब्लिक स्कुलमध्ये आज शनिवारी (दि. १५ ऑगस्ट) रोजी कोरोनामुळे ७४ वा स्वातंत्र्यदिन साधेपणाने साजरा करण्यात आला. संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष संदीप काटे यांच्या नेतृत्वाखाली ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सामाजिक अंतर राखून हा कार्यक्रम साजरा झाला.
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) दहावीच्या परीक्षेत शाळेतून पहिली आलेली विद्यार्थिनी मानसी प्रशांत गांगजी हिच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सुषमा उपाध्ये, पूर्वप्राथमिक विभागप्रमुख पलक गांधी, रुपाली डिमॉन्टी, सेजल पाटील, सूचिता करंजवाला, रोहिणी राशीनकर, स्मृती करंजेकर, कमल गांगजी या शिक्षकवृंदानी झेंड्याला मानवंदना दिली. कार्यक्रमासाठी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचेही सहकार्य लाभले.
शाळेचे संस्थापक संदीप काटे यावेळी बोलताना म्हणाले की, यंदा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थ्यांच्या अनुपस्थित देशाचा ७४ वा स्वातंत्र्यदिन शाळेने साधेपणाने साजरा केला. शासनाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचा आदर करून, मोजक्याच मान्यवरांच्या उपस्थितीत कोणताही जल्लोष न करता ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. देशाच्या स्वातंत्र्यात थोर समाजसुधारक, क्रांतिकारक यांचा मोलाचा वाटा होता. त्यामुळेच देशाला स्वातंत्र्य मिळाले. या दिवशी त्यांचे अनुकरण करून, कोरोनापासून समस्त मानवजातीला स्वातंत्र्य मिळावे, याकरीता सुरक्षा साधनांचा अधिकाधिक वापर करू व कोरोनापासून मुक्ती मिळवू, असा संकल्प करूया.