न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९. ऑगस्ट. २०२०) :- स्वच्छ सर्वेक्षण अभियान २०२० मध्ये लोणावळा नगरपरिषदेने देशात तिसरा क्रमांक मिळविला आहे. मागील तीन वर्षे लोणावळा नगरपरिषदेने या स्पर्धेत सहभाग घेत सलग तिन्ही वेळेस राष्ट्रीय नामांकन मिळविले.
२० ऑगस्ट रोजी ऑनलाईन पद्धतीने या पुरस्काराचे वितरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. एक लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या ३८९८ व ५० हजार ते १ लाख लोकसंख्या असलेल्या ५४४ शहरांनी यास्पर्धेत सहभाग घेतला होता. लोणावळा शहराची आजमितीला लोकसंख्या ५७ हजार ६९८ असून बाहेरून फिरायला येणाऱ्या पर्यटकांची दैनंदिन सरासरी संख्या १३ हजार ३२१ इतकी आहे.
अतिशय अटितटीच्या या स्पर्धेत लोणावळा नगरपरिषदेने तिसरा क्रमांक मिळविला. यापुर्वी २०१८ मध्ये लोणावळा नगरपरिषद सातव्या व २०१९ मध्ये दुसऱ्या क्रमांकावर होती. स्वच्छ सर्वेक्षण २०२० अंतर्गत लोणावळा नगरपरिषदेने कार्यक्रमांचे आयोजन केले होते. यामध्ये १८ हजार ३०२ जणांनी सहभाग नोंदविला होता.
यावर्षी लोणावळा शहराला देश पातळीवर पहिल्या क्रमांकाचे बनविण्यासाठी शहरातील सर्व नागरिकांनी तसेच पर्यटकांनी ‘ मी लोणावळेकर ‘ म्हणून नगरपरिषदेला सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, नवनियुक्त मुख्याधिकारी रवि पवार यांनी केले होते.