न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९. ऑगस्ट २०२०) :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पर्यटन स्थळांवर जाण्यास बंदी असतानाही चौघे मित्र तळेगाव जवळील कुंडमळा धबधब्याकडे गेले. त्यातील एकजण चप्पल धुण्यासाठी पाण्यात उतरला. अनं त्याचा तोल जाऊन तो पाण्यात पडला. पाण्याचा प्रवाह प्रचंड असल्याने त्याला काठावर येता आले नाही. त्यामुळे तो वाहून गेला.
त्याचा मृतदेह अद्याप सापडलेला नसून एनडीआरएफचे पथक त्याचा शोध घेत आहे. ही घटना मंगळवारी (दि. १८) दुपारी घडली. तरबेज शाहजान पटेल (वय ३०, रा. खराळवाडी, पिंपरी) असे बुडालेल्या तरुणाचे नाव आहे. तरबेजचा शोध लागल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.