- शहरातील रॅकेटचा पोलिसांकडून पर्दाफाश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ सप्टेंबर २०२०) :- सोन्याच्या अंगठ्या म्हणून तांब्याच्या व चांदीच्या तारांना सोन्याचा त्या तारेवर मुलामा देऊन सोन्याच्या बनावट अंगठ्या विकणारा व बनावट अंगठी तयार करणारा कारागीर अशा दोघांना लोणी कंद पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून १६ बनावट अंगठ्या, हॉलमार्क करण्याचे साहित्य, दागिने बनविणारी मशिन असा एकूण साडेतीन लाखांचा ऐवज लोणी कंद पोलिसांनी जप्त केला आहे.
पंकज अशोक टाक (वय ३७, रा. पिंपरी चिंचवड) असे बनावट अंगठ्या तयार करुन विकणारा व बिलाल उर्फ बिल्ला फिरदोस शेख (वय ३१, रा. चिंचवड) असे बनावट दागिने बनविणाऱ्या कारागिराचे नाव आहे. दोघांनाही पोलिसांनी फसवणूक केल्याप्रकरणी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंबेगाव बुद्रुक येथील प्रवीण गायकवाड यांना फेब्रुवारीमध्ये पंकज टाक याने ऐका तोळ्याची सोन्याची अंगठी पेरणे फाटा येथे २७ हजार रूपयांना विकली होती. सदरची अंगठी मोडण्यासाठी सोनाराकडे गेले असता अंगठीला दोन ग्रॅम सोन्याचा मुलामा व आतमध्ये चांदीची तार असल्याचे त्या सोनाराने त्यांना सांगितले. त्यांची फसवणूक झाली असल्याचे समजताच गायकवाड यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दाखल केली. लोणी कंदचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध शाखेने पंकज टाक याचा शोध घेत टाक व सोन्याचे दागिने बनविणारा कारागीर बिल्ला शेख या दोघांना पिंपरी चिंचवड येथून ताब्यात घेतले. त्यांनी अशाच प्रकारच्या बनावट अंगठ्या अनेक जणांना विकल्याचे चौकशीत उघडकीस आले आहे. त्यांच्याकडून १६ बनावट अंगठ्या, हॉलमार्क करण्याचे साहित्य, दागिने बनविणारी मशीन असा एकूण साडे तीन लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.