न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ सप्टेंबर २०२०) :- मिक्सर ट्रॅकचा पाईप लिफ्टमधून वर घेत असताना लिफ्टमधून पाईप कामगाराच्या अंगावर पडला. त्यामध्ये कामगाराचा मृत्यू झाला. घटना वाकड येथील स्नेहांगण बांधकाम साईटवर घडली.
मनोजकुमार सुक्कू कैफल असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी पंकज उर्फ नथन सुक्कू कैफल ( पासवान ) ( वय ३३, रा . सॅलीसबरी पार्क, पुणे) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अभी कन्स्ट्रक्शनचे प्रोप्रायटर दिनेश बाबूलाल सिंग ( रा . थेरगाव ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
वाकड येथे २९ जून रोजी स्नेहांगण बांधकाम साईटवरील ए विंगचा पाचवा स्लॅब भरण्याचे काम सुरु होते. मयत मनोजकुमार त्या साईटवर कामाला होते. मिक्सरच्या ट्रॅकचा पाईप लिफ्टमधून वर घेत असताना मनोजकुमार मिक्सर मशीनला दगड लावण्याचे काम करत होते. लिफ्टमधून पाईपवर घेत असताना पाईप मनोजकुमार यांच्या डोक्यात पडला. त्यामध्ये मनोजकुमार गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. कामगाराना सुरक्षेची साधने न पुरवता निष्काळजीपणा केल्यामुळे हा प्रकार पडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.