न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ सप्टेंबर २०२०) :- दुध देण्याच्या बहाण्याने नोकर आणि त्याच्या दोन अनोळखी साथीदारांनी मालकिणीच्या घरात प्रवेश केला. मालकीण आणि तिच्या घरातील सदस्यांना कोयत्याचा धाक दाखवून घरातून सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि अन्य साहित्य असा एकूण दोन लाख २५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.
ही घटना शनिवारी (दि. १२) पहाटे साडेपाचच्या सुमारास यमुनानगर, निगडी येथे जीवनधारा हाऊसिंग सोसायटीमध्ये घडली. स्मिता रमेश औताडे (वय ३२, रा. जीवनधारा हाऊसिंग सोसायटी, यमुनानगर, निगडी) यांनी या प्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी किरण बोरा (वय २५) आणि त्याचे दोन अनोळखी साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपी किरण बोरा हा फिर्यादी यांच्या घरी नोकर म्हणून काम करत होता. शनिवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास किरण आणि त्याचे दोन साथीदार दुध देण्याच्या बहाण्याने फिर्यादी यांच्या घरात आले. त्यांनी फिर्यादी स्मिता आणि त्यांच्या कुटुंबियांना कोयत्याचा धाक दाखवून कोयत्याने उलट्या बाजूने मारले. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. मंगळसूत्र, अंगठ्या, रोकड, चावी, घड्याळ असा दोन लाख २५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.