न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ सप्टेंबर २०२०) :- मारहाण प्रकरणी दाखल गुन्ह्यातील दोघांना जेरबंद करण्यात आले. दोघेही निगडी पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या खंडणी, दरोडा विरोधी पथकाने त्यांना अटक केली. धनंजय ऊर्फ बबल्या सूर्यकांत रणदिवे (वय २२), जाधव (वय २२, रा. ओटास्किम, निगडी), अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
अटक केलेल्या आरोपींच्या विरोधात निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. हरनामसिंग कांचनसिंग जुनी (वय २१, रा. ओटा स्किम, निगडी) यांनी याबाबत फिर्याद दिली होती. त्यानुसार पोलिसांनी धनंजय आणि सचिन यांच्यासह सात जणांवर गुन्हा दाखल केला होता.
फिर्यादी जुन्नी आणि आरोपी यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी किरकोळ कारणांवरून भांडण झाले होते. त्या भांडणाच्या रागातून आरोपींनी संगनमत करून २ सप्टेंबर रोजी रात्री साडेआठला फिर्यादी आणि त्यांच्या दोन मित्रांवर हल्ला केला. पालघन , कोयता , फायटर , तलवार आणि लोखंडी पाइपने आरोपींनी तिघांना मारहाण केली. यात ते जखमी झाले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा समांतर तपास खंडणी दरोडा विरोधी पथक करत होते. खंडणी, दरोडा विरोधी पथकाचे अधिकारी आणि कर्मचारी रविवारी पोलीस आयुक्तालयातील टॉप २५, तडीपार, फरारी आरोपींचा शोध घेत पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी पोलीस नाईक निशांत काळे व राजेश कौशल्य यांना मिळालेल्या माहितीनुसार सापळा रचून दोघांना पकडण्यात आले.