- शहर राष्ट्रवादीचे वाघेरे पाटील व प्रशांत शितोळे यांचा अप्रत्यक्षपणे आमदारांना टोला…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी दि. १५ सप्टेंबर २०२०) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध विकासकामांसाठी राज्य शासनाने ३३ टक्केपेक्षा जास्त १७०० कोटी रुपयांच्या खर्चास मंजुरी दिली आहे. मात्र, त्यातील बहुतांश कामे केवळ एका विधानसभा मतदारसंघातील असल्याने पडद्यामागच्या सुत्रधाराचा तीळपापड झाला आहे. त्यामुळे त्यांनी महापौर व पक्षनेत्यांना पुढे केले. जे दुसऱ्याच्या आकलेने चालतात त्यांनी आम्ही काय केले याची अक्कल शिकवू नये.
शहरातील एकमेव राष्ट्रवादी आमदार अण्णा बनसोडे यांनी कोविड १९ काळात शहरासाठी ४१.५० लाख दिले, एका खाजगी बँकेच्या सीएसआरमधून ४० लाख दिले. राज्यातील महाविकास आघाडी सरकारकडून २ कोटी २५ लाख निधी दिला. तरी भाजपचे पदाधिकारी म्हणतात राज्य सरकारने दीड कोटी रुपये दिले. उलट पिंपरी चिंचवड मधील नागरिकांनी भाजपला भरभरून दिले, महापालिकेची सत्ता दिली. त्या भाजपच्या दोन कारभाऱ्यांनी किती निधी दिला हे जाहीर करावे. तसेच शहरातील एकाच मतदारसंघात १७०० कोटीचा निधी का नेला हेही जाहीर करावे.
भाजपने मोठ्या पदांवर विराजमान केलेल्या व प्रशासनाचा गाडा हाकणाऱ्या महापौर व पक्षनेते यांना आपल्याच महानगरपालिकेची माहिती नाही हे शहराचे दुर्भाग्य आहे. आकड्यांचा खेळ करणाऱ्या भाजपने दुसऱ्याच्या अकलेचे तारे मोजण्यापेक्षा स्वतःचे ज्ञान तपासून पहावे असा, हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील व कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे.