- स्थायी समितीपुढे प्रस्ताव सादर; आज होणार शिक्कामोर्तब…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ सप्टेंबर. २०२०) :- वाढत्या करोना रुग्णसंख्येमुळे पालिकेच्या यंत्रणेवर असलेला ताण आणि अपुऱ्या मनुष्यबळाचे कारण देत पिंपरी पालिकेने शहरातील १८ करोना काळजी केंद्रांचे (करोना केअर सेंटर) खासगीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. खासगी रुग्णालये तसेच खासगी संस्थांना ही केंद्र तीन महिन्यांसाठी चालवण्यासाठी देण्यात येणार असून त्यासाठी पालिकेकडून सुमारे २० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे.
पालिकेने सुरू केलेली करोना काळजी केंद्र आता खासगी पद्धतीने चालवण्यासाठी देण्याचा निर्णय आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी घेतला आहे. आज बुधवारी (१६ सप्टेंबर) स्थायी समितीपुढे यासाठी येणाऱ्या सुमारे २० कोटी रुपये खर्चास मान्यता देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आलेला आहे.
प्रस्तावात नमूद केल्यानुसार, बालेवाडी क्रीडासंकुल (बालेवाडी), म्हाडा वसाहतीच्या चार इमारती (म्हाळुंगे), डॉ. डी. वाय. पाटील मुलींचे वसतिगृह (रावेत), मागासवर्गीय मुलांचे वसतिगृह व सामाजिक न्याय विभागाचे वसतिगृह (मोशी), घरकुल प्रकल्पातील सहा इमारती (चिखली), बालाजी विधी महाविद्यालय (ताथवडे), पीसीसीओपी महाविद्यालय वसतिगृह (आकुर्डी-प्राधिकरण) आदी ठिकाणी महापालिकेच्या वतीने करोना काळजी केंद्र सुरू करण्यात आले आहे. यापुढे तीन महिन्यांच्या कालावधीसाठी खासगी पद्धतीने ही केंद्र चालवण्यासाठी देण्यात येणार आहेत.
खासगी रुग्णालये, त्यांच्याकडील खाटांची संख्या आणि त्यांना पालिकेकडून देण्यात येणारी खर्चाची रक्कम पुढीलप्रमाणे आहे. बीव्हीजी ग्रूप (५०० खाटा, २ कोटी ३२ लाख), ट्रस्ट हेल्थ केअर (४०० खाटा, २ कोटी २३ लाख), मे. आयकॉन हॉस्पिटल (८०० खाटा, ३ कोटी ९० लाख), मे. डीवाईन हॉस्पिटल (४०० खाटा, एक कोटी ९५ लाख), डॉ. भिसे हॉस्पिटल (८०० खाटा, ३ कोटी ६७ लाख), रूबी अलकेअर (६०० खाटा, २ कोटी ७० लाख), आयुश्री हॉस्पिटल (१०० खाटा, एक कोटी ३४ लाख), एक्स. एस. टी. प्रा. लि. (१०० खाटा, एक कोटी ३४ लाख रुपये).