- शासनाच्या नाकर्तेपणामुळे चारशे अद्ययावत खाटा धूळखात पडून…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ सप्टेंबर. २०२०) :- कोट्यवधी रुपये खर्च करून हिंजवडीत विप्रोने सर्व सोयीसुविधांनी सज्ज करून फुकटात राज्य सरकारला सुपूर्त केलेल्या रुग्णालयाची दुरवस्था झाली आहे. विप्रोने ५०४ रुग्ण क्षमतेचे ‘कोविड हॉस्पिटल’ चार महिन्यानंतरही राज्य सरकार पूर्ण क्षमतेने सुरु करु शकलेले नाही. एकीकडे खाटा मिळत नाहीत म्हणून कोरोना रुग्णांचा आक्रोश चालू आहे. दुसरीकडे विप्रोतल्या सुमारे चारशे अद्ययावत खाटा केवळ शासनाच्या नाकर्तेपणामुळे धूळ खात पडून आहेत.
एवढेच नाही तर डॉक्टर उपलब्ध नसल्याने विप्रो कोविड केंद्रातले पेंटिलेटरसुद्धा वापराविना पडून असल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे. जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढू लागल्यानंतर अनेक खासगी कंपन्या, संस्थांनी पुढाकार घेऊन सरकारला मदत म्हणून ‘ सीएसआर ‘ निधीतून अनेक कोविड केअर केंद्रे सुरू केली आहेत.
मुळशी तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्यानंतर विप्रो कंपनीने हिंजवडी येथे ५०४ खाटा, १० अतिदक्षता खाटा आणि ५ व्हेंटिलेटर असलेले सुसज्ज कोविड रुग्णालय सुरू केले. त्याचे ऑनलाइन उद्घाटन ११ जून रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते.