न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ सप्टेंबर. २०२०) :- कोरोना रुग्णांचे जटिजेन व आरटीपीसीआर चाचणी अहवाल लवकर मिळत नाहीत, त्यामुळे उपचाराला विलंब होतो. चाचणी अहवाल तातडीने मिळावेत, अशी मागणी पिंपरी चिंचवड शहर मनसेच्या वतीने केली आहे.
पिंपरी – चिंचवड शहरामध्ये कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना रुग्ण शहरात वाढत आहेत. महापालिकेच्या वतीने कोरोना रुग्णांचे तपासणी अहवाल ९ ते १० दिवस रुग्णांना मिळत नाही. त्यामुळे शहरातील असंख्य कोरोनाबाधित रुग्ण दगावत आहेत. याविषयी मनसेने महापालिका आयुक्तांना निवेदन दिले.
यावेळी शहराध्यक्ष सचिन चिखले, अंकुश तापकीर, मयूर हजारे, गणेश उज्जेनकर, जय सकट, काशिनाथ जाधव, प्रदीप गायकवाड आदी उपस्थित होते.
शहराध्यक्ष आणि गटनेते सचिन चिखले म्हणाले, “ हॉस्पिटलमधून कोरोना चाचणी अहवाल वेळेत मिळत नाही, त्यामुळे रुग्णांवर उपचार करण्यासाठी वेळ लागतो. अशा अनेक तक्रारी समोर आलेल्या आहेत. यामध्ये नुकतीच एक घटना घडली आहे. रुपीनगरमधील एका व्यक्तीची आरटीपीसीआर ही चाचणी अहवाल उशिरा आला. त्यामुळे ही व्यक्ती मृत झाली. कोरोना अहवाल चाचणी दोन दिवसांत मिळावा, असे या निवेदनात चिखले यांनी म्हटले आहे.