न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ सप्टेंबर २०२०) :- देहूरोड पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार जोयल भास्कर पलाणी (वय २१, रा. साईनगर, मामुर्डी) याच्यावर एमपीडीए कायद्यान्वये एक वर्षासाठी स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली.
पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी शनिवारी (दि. १९) स्थानबद्धतेचे आदेश दिले असून, त्यानुसार आरोपी पलाणी याची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. मामुर्डी, साईनगर, देहुरोड भागात विविध गुन्हे करीत त्याने दहशत माजविली होती. त्याला प्रतिबंध घालण्यासाठी त्याच्यावर तडीपारीची कारवाई केली होती.
तडीपार असतानाही आरोपी पलाणी देहूरोड हद्दीत येऊन तडीपार आदेशाचा भंग करीत होता. तडीपार असताना त्याने दोन गुन्हे केले. रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर वचक बसावा म्हणून देहूरोड पोलिसांकडून प्रस्ताव सादर करण्यात आला त्यानुसार आरोपी पलाणी याला स्थानबद्ध करण्यात आले.