न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ सप्टेंबर २०२०) :- दुचाकीचा क्रमांक ओळखता येऊ नये म्हणून नंबर प्लेटवर चिखल लावून पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या एका टोळीला पोलिसांनी जेरबंद केले आहे. दोन अल्पवयीन मुलांसह सहा जणांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांचे तीन साथीदार पळून गेले आहेत. पिंपरी – चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या खंडणी दरोडा विरोधी पथकाने सोमवारी (दि. २२) रात्री पावणे दहाच्या सुमारास ही कारवाई केली.
अटक आरोपींना न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. राहुल रमेश चव्हाण (वय १९, रा. भारत मातानगर, दिघी), शेखर संभाजी जाधव (वय २१, रा. मोघा, ता. उदगीर, जि. लातूर), करण गुरुनाथ राठोड (वय १९, रा. दिघी रोड, भोसरी), कृष्णा संजय तांगतोडे (वय २०, रा. पाथर्डी, ता. जि. नाशिक) यांना अटक करण्यात आली आहे. तर १७ वर्षीय दोन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर अस्पत यांनी दिलेल्या माहितीनुसार, काही इसम दुचाकीवर दिघी येथे पाण्याच्या टाकीच्या बाजूला मैदानात संशयितरित्या थांबले आहेत. त्यांच्याकडे घातक शस्त्रे असून ते दरोडा घालणार आहेत, अशी माहिती खंडणी दरोडा विरोधी पथकातील पोलीस नाईक किरण काटकर व नितीन लोखंडे यांना मिळाली होती. त्यानुसार रात्री पावणेदहाच्या सुमारास पोलिसांनी सापळा लावून सहा जणांना पकडले तर तिघे जण अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. ताब्यात घेतलेल्या सहा जणांमध्ये दोघेजण अल्पवयीन आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी एक सुरा, पाच कोयते, एक मोबाइल फोन, दोन दुचाकी असा एकूण ९० हजार ५५० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. दुचाकी ओळखु नये यासाठी आरोपींनी नंबर प्लेटवर चिखल लावला होता.