न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ सप्टेंबर २०२०) :- लॉकडाउनमुळे गांजा विक्री ठप्प झाली होती. मात्र, राज्यात अनलॉक प्रक्रिया सुरु झाल्यानंतर पुन्हा गांजा विक्रीचा सुळसुळाट सुरू झाला आहे. दरम्यान, गांजा हा स्लम भागात कमी दराने मिळतो. तर, उच्चभ्रू भागात म्हणजे आयटी हब अश्या ठिकाणी गांजाला मोठ्या प्रमानावर मागणी असून त्याला चांगला दर मिळतो. अशाच दोन घटना शहरात उघडकीस आल्या आहेत.
अंमली पदार्थ विरोधी पथकाने पुण्यामधील हिंजवडीतील ‘आयटी हब’मध्ये ६ लाख ४० हजार किलो रुपयांचा २५ किलो गांजा जप्त केला आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकाने हिंजवडी येथे गांजा विक्रीसाठी आलेल्या तरुणाला सापळा रचून अटक केली आहे. त्याच्याकडून सहा लाखांपेक्षा जास्त किंमतीचा गांजा जप्त केला आहे. गांजासह अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव योगेश्वर गजानन फाटे (वय- २३, रा. जनता वसाहत, गोखलेनगर पुणे) असे आहे.
दुसऱ्या घटनेत गांजा बाळगणाऱ्या एका वृद्ध महिलेला निगडी पोलिसांनी अटक केली आहे. तिच्याकडून एक किलो ४३० ग्राम गांजा जप्त करण्यात आला आहे. यशोदा बाबू पवार (वय ७०, रा. ओटास्कीम, निगडी) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस नाईक सतीश ढोले यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ओटास्कीम, निगडी येथील पेरूची बाग येथे एक वृद्ध महिला गांजा विक्री करत असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी छापा मारून एका वृद्ध महिलेला ताब्यात घेतले. तिच्याकडून ३७ हजार ७५० रुपयांचा एक किलो ४३० ग्राम गांजा जप्त केला आहे.