- म्हणाले ‘मोशीतील सफारी पार्क प्रकल्पाला देखील शेकडो कोटींचा खर्च’…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ सप्टेंबर २०२०) :- कोरोना प्रादुर्भावामुळे आलेल्या आर्थिक संकटात एकाच प्रभागात (वाकड) शंभर कोटी रुपये खर्चाची कामे करणे कितपत योग्य आहे, असा प्रश्न महापौर उषा ढोरे यांनी उपस्थित केला होता.
यावर जोरदार पलटवार राहुल कलाटे यांनी केला आहे, पिंपरी-चिंचवड शहरातील चांगल्या पद्धतीने विकसित होत असलेला भाग म्हणून वाकड- ताथवडे- पुनावळे हा परिसर हा केवळ एक प्रभाग नसून तीन गावे आहेत. याच परिसरातून पालिकेला जास्त मिळकत कर व बांधकाम परवानगी विभागाला सर्वात जास्त विकास निधी मिळतो. तरी देखील या भागातील विकास कामांना भाजप अडकाठी घालते.
दोन दिवसांपूर्वी महाविकासआघाडी सरकारने भोसरी मतदारसंघातील मोशी येथील सफारी पार्कच्या शेकडो कोटींच्या खर्चाच्या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. तोसुद्धा एकाच प्रभागात खर्च होणार आहे. तुम्ही महापौर म्हणून त्याला विरोध करणार का?, असा सवाल कलाटे यांनी केला आहे.
चऱ्होली भागात शेकडो कोटींची कामे चालू आहेत. त्यालाही विरोध करणार का? पिंपळेगुरव व पिंपळेसौदागर या ठिकाणी तर स्मार्ट सिटीची शेकडो कोटी रुपयांची कामे चालू आहेत. ती पण कामे बंद करणार का? सिमेंट काँक्रीट व डांबरीकरण या कामातला फरक पहायचा असेल तर पिंपळेगुरव मध्ये सर्व डांबरी रस्ते उखडून टाकून स्मार्ट सिटीची कामे करून खर्चाचा आकडा फुगवला ते दिसत नाही का? उलट मोठे रस्ते करताना खाली डांबर असेल तर त्यावर काँक्रीटीकरण करत असताना जुन्या रस्त्याची गुणवत्ता नियमाप्रमाणे तपासली का? मागील सर्वसाधारण सभेत स्वतःच्या सांगवी व पिंपळेगुरव या भागात १०० कोटी वरून जास्त रक्कमेचे वर्गीकरण केले. त्यावेळी आपल्याला संपूर्ण शहराची आठवण का नाही झाली, असे अनके प्रश्न कलाटे यांनी विचारले आहेत.