न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ सप्टेंबर २०२०) :- जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केलेल्या गुंडाला वाकड पोलिसांनी पुनावळे येथे सापळा लावून पकडले. त्याच्याकडून गावठी कट्टा व दोन काडतुसे जप्त केली. ही कारवाई बुधवारी (दि. २३) सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास केली. साहिल रामदास कुंभार (वय २२, रा. माऊली चाळ, बिजलीनगर, चिंचवड) असे आरोपीचे नाव आहे.
पोलीस कर्मचारी के. एम. पाटील यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुनावळे येथील संत तुकाराम महाराज ब्रिजजवळ आरोपी येणार असून त्याच्याकडे पिस्तूल सारखे हत्यार आहे, अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक प्रणिल चौगुले यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून आरोपी याला पकडले. आरोपीविरोधात चिंचवड आणि वाकड ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.
त्यामुळे आरोपीला ५ फेब्रुवारी २०२० रोजी पुणे जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार केले होते. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे १० हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा आणि दोन हजार रुपये किमतीचे दोन काडतुसे असा एकूण १२ हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आला.