न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ सप्टेंबर २०२०) :- विविध मागण्यांसाठी गुरुवारी (दि. २४) पिंपरी – चिंचवड शहरातील सर्व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी लेखणीबंद आंदोलन केले. महाराष्ट राज्य महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष प्रकाश म्हसे यांच्या अध्यक्षतेखाली हे आंदोलन झाले.
यावेळी अनिल शिंदे, विक्रम शिंदे व महाविद्यालयतील सर्व शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते. यावेळी सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचे राज्य शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे २८ डिसेंबर २०१० व १५ फेब्रुवारी, २०११ रोजीचे रद्द केलेले सुधारित शासन निर्णय वित्त विभागाची कार्योत्तर मान्यता घेऊन पुनर्जीवित करून ते पुन्हा पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यात यावेत.
अकृषी विद्यापीठीय शिक्षकेतर पदांसाठी सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार सुधारित वेतन संरचना त्वरित लागू करावी. अकृषी विद्यापीठे व त्या विद्यापीठांशी संलग्नित अशासकीय अनुदानित महाविद्यालयांना पाच दिवसांचा आठवडा लागू करावा. अकृषी विद्यापीठे व त्या विद्यापीठांशी संलग्नित अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमधील शासनमान्य व अनुदानित रिक्त पदे तत्काळ भरण्यास मान्यता द्यावी, आदी मागण्या करण्यात आल्या. दरम्यान, मागण्या मान्य न झाल्यास १ ऑक्टोबरपासून काम बंद आंदोलन पुकारण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.