- मोकाट गुरांना आणि त्यांच्या या तथाकथित मालकांना आवरणार कधी?
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ सप्टेंबर २०२०) :- पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटीत बेवारस मोकाट गुरांचा वावर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. वाहनधारकांना व रस्त्यावरून जाणा-या पादचा-यांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. अशावेळी या मोकाट गुरांना आणि त्यांच्या या तथाकथित मालकांना आवरणार कधी? असा सवाल स्मार्ट शहरातील नागरिक विचारत आहेत.
स्मार्ट सिटीच्या या दृश्यामुळे नागरिकांच्या मनात नकारात्मक प्रतिमा निर्माण होऊ लागली आहे. अचानकपणे वाहनांच्या हॉर्नमुळे ही जनावरे पळत सुटतात. पिंपरी बाजारपेठ व कॅम्प तसेच चिंचवडगाव परिसरात यामुळे अनेकदा लहान – मोठे अपघात झालेले दिसून येतात. रस्त्यावरून चालणारे पादचारी किंवा वाहनधारक यांना धडक बसल्याने अनेक जणांना मार लागलेला आहे.
जनावरांच्या रस्त्यावरील अतिक्रमणामुळे मोठ्या गाड्यांना व नागरिकांना कसरत करूनच रस्ता ओलांडावा लागतो. याकडे महापालिका प्रशासनाचे मोठे दुर्लक्ष होत असल्याची टीका केली जात आहे. गेल्या अनेक दिवसांपासून महापालिकेच्या वतीने कोणतीही कारवाई झालेली नाही. बेवारस जनावरांना पकडून गोशाळेत द्यावे असे नागरिकांचे मत आहे. जर असेच घडत राहिल्यास शहरामध्ये वाहतूक कोंडी आणि अपघाताचे प्रमाण वाढण्याची शक्यता नाकारता येणार नाही.