- एकनाथ खडसेंच्या तोंडाला पुन्हा एकदा पानंच पुसली…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ सप्टेंबर २०२०) :- भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर जवळपास ८ महिन्यांनी जे. पी. नड्डा यांनी पक्षाची नवी टीम तयार केली आहे. या नव्या धुरिणांमध्ये महाराष्ट्रातल्या दोन मोठ्या नेत्यांची नावं आहेत.
भाजपच्या कार्यकारिणीची घोषणा नड्डा यांनी केली. या नव्या कार्यकारिणीमध्ये महिला आणि तरुणांना मोठी संधी देण्यात आली आहे. अर्थातच महाराष्ट्रातले चार तरुण चेहरे यामध्ये आहेत. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बिहार निवडणुकीचे प्रभारी म्हणून या अगोदरच मोठी जबाबदारी देण्यात आलेली आहे. आता नव्या कार्यकारिणीत पंकजा मुंडेंसह विनोद तावडे यांच्यावरही पक्षाने महत्त्वाची जबाबदारी दिली आहे.
एकूण 13 जणांना National Secretary म्हणून नेमण्यात आलं आहेत. त्यामध्ये महाराष्ट्रातले ४ नेते आहेत. पंकजा मुंडे, विनोद तावडे, सुनील देवधर आणि विजया रहाटकर यांची नावं या यादीत आहेत. याशिवाय राष्ट्रीय प्रवक्त्यांच्या यादीत खासदार हीना गावित यांना स्थान देण्यात आलं आहे. अल्पसंख्याक मोर्चाचे नेते म्हणून जमाल सिद्दीकी यांचं नाव आहे.
खडसेंना पुन्हा डावललं
एकनाथ खडसे यांच्या तोंडाला मात्र पक्षाने पुन्हा एकदा पानं पुसली आहेत. खडसे गेले काही महिने सातत्याने महाराष्ट्रात फडणवीसांविरोधात जाहीरपणे बोलत आहेत. आपल्याला मुद्दाम डावलल्याची खंत बोलून दाखवत त्यांनी महाराष्ट्र भाजपला शालजोडीतले दिले आहेत. पण केंद्रीय पातळीवरच्या भाजप नेतृत्वाने पुन्हा एकदा खडसेंकडे दुर्लक्ष केल्याचं दिसतं. खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची चर्चा काही दिवसांपासून सुरू आहे.हेही त्यामागचं कारण असू शकतं.